ब्लॉग डिटेल

  • K–Ca–Mg मधील परस्पर विरोध — संतुलनच खरी गुरुकिल्ली

    K–Ca–Mg मधील परस्पर विरोध — संतुलनच खरी गुरुकिल्ली

    Posted on : 16 Dec 2025 By : Agri Search (India) Pvt. Ltd

    K–Ca–Mg मधील परस्पर विरोध — संतुलनच खरी गुरुकिल्ली

    मित्रांनो,
    पिकांच्या योग्य वाढीसाठी पोटॅश (K), कॅल्शियम (Ca) आणि मॅग्नेशियम (Mg) ही तीनही अन्नद्रव्ये अत्यंत आवश्यक आहेत. मात्र ही तिन्ही अन्नद्रव्ये धनायन (positive ions) स्वरूपात असल्यामुळे जमिनीत व मुळांमध्ये एकमेकांशी स्पर्धा करतात. एखादे अन्नद्रव्य जास्त झाले तर दुसऱ्याचे शोषण कमी होते. या प्रक्रियेलाच परस्पर विरोध (Antagonism) असे म्हणतात.

    K जास्त → Mg कमी

    या तिघांमध्ये सर्वात तीव्र परस्पर विरोध पोटॅश आणि मॅग्नेशियममध्ये दिसून येतो. पोटॅशसाठी मुळांमध्ये विशिष्ट वाहक प्रणाली (transporters) असते, तर मॅग्नेशियम सामान्य शोषण मार्ग वापरतो. त्यामुळे जमिनीत K जास्त झाल्यास सर्वप्रथम Mg चे शोषण कमी होते. यामुळे पानांच्या कडांना पिवळसरपणा, हिरव्या रंगात फिकटपणा आणि कधी कधी टिप-बर्नसारखी लक्षणे दिसतात.

    K जास्त → Ca कमी

    पोटॅशियम जास्त असल्यास कॅल्शियमचे शोषणही घटते. कारण दोन्ही अन्नद्रव्ये मातीतील कणांवर आणि मुळांच्या पेशींवर एकाच शोषण जागेसाठी स्पर्धा करतात. टोमॅटो, मिरची, डाळिंब यांसारख्या पिकांमध्ये ब्लॉसम एन्ड रॉट, फळांवर तडे जाणे आणि साठवण क्षमतेत घट अशी लक्षणे आढळतात.

    Ca ↔ Mg परस्पर विरोध

    कॅल्शियम आणि मॅग्नेशियम हे दोन्ही दुहेरी धनायन (Ca²⁺ आणि Mg²⁺) असल्यामुळे एकमेकांच्या शोषणावर परिणाम करतात. जर जमिनीत कॅल्शियम अतिप्रमाणात असेल तर मॅग्नेशियमची कमतरता लवकर दिसून येते, विशेषतः अल्कलाइन जमिनीत.

    संतुलनच योग्य उपाय

     

    योग्य पोषणासाठी K : Ca : Mg यांचे संतुलन अत्यंत महत्त्वाचे आहे. साधारणपणे ३–५ : ३–५ : १ असे प्रमाण योग्य मानले जाते. असंतुलन आढळल्यास फवारणीद्वारे कॅल्शियम व मॅग्नेशियमची पूर्तता करावी आणि मातीतील पोटॅशचा अति वापर टाळावा. योग्य संतुलन ठेवल्यास फुलधारणा, फळविकास, गुणवत्ता आणि उत्पादन सर्वच बाबतीत सुधारणा दिसून येते.